Monday, July 17, 2017

पुढचा दिवस..

वीकेन्डचे इतर प्लॅन्स असल्याने डी-क्लटरिंगलाही सुट्टी दिली होती.
दरम्यान ब्लॉगवर एक मजेशीर प्रतिसाद वाचायला मिळाला- ’बायकांना कठीण जातंच वस्तुंचा मोह सोडणे’. मजेशीर अशा अर्थाने की एकंदरीतच स्त्रिया आणि मिनिमलिझम या दोन गोष्टी एकत्र जात नाहीत असं अनेकांचं म्हणणं असतं. एकतर त्यांना खरेदीचा सोस आणि सांभाळून ठेवण्याचा मोह असा एक समज आहे जो तितकासा खरा नाही. माझ्या आधीच्या पोस्ट्समधे यावर सविस्तर लिहूनही झालेलं आहे. नव्या वाचकांकरता त्यातला काही भाग पुन्हा एकदा-

"स्त्रिया जास्त खरेदी करतात, वस्तुंमधे गुंततात, आपल्या आसपास आवडत्या गोष्टींचा पसारा असणे त्यांना आवडते या कशाही पेक्षा जास्त महत्वाचे एक गोष्ट त्यांच्याजवळ असते, जी मिनिमलिझमच्या दृष्टीने आत्यंतिक गरजेची, ती म्हणजे ’मुव्हिंग ऑन’.
आठवणींना, परिस्थितीला मागे टाकून त्या अतिशय सहजतेनं आयुष्यात पुढे जाऊ शकतात. आपले आयुष्य नव्याने सुरु करु शकतात. शिवाय परिस्थितीशी, वातावरणाशी तडजोड करण्याची क्षमता त्यांच्यात जास्त असते. एकदा जे ठरवलं आहे ते पार पाडण्याचा किंवा त्यानुसार वागण्याचा निग्रहही त्यांच्यात जास्त असतो.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे मिनिमलिझम हा वैयक्तिक पातळीवर यशस्वी करुन दाखवणारे स्त्री आणि पुरुष यांच्या आकडेवारीपेक्षा महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या कुटुंबाला सोबत घेऊन मिनिमलिझम अंगिकारणे किती जणांना शक्य झाले. याबाबतीत स्त्रिया नि:संशयपणे पुरुषांपेक्षा जास्त संख्येने यशस्वी झाल्या आहेत आजवर.
एक स्त्री शिकली की सारे घर शिकते या गृहितकालाच पुढे नेणारी ही गोष्ट आहे."

असो.

तर आज दिवसभर पाऊस असल्याने छत्र्यांकडे लक्ष जाणं साहजिकच. घरातल्या माणसांच्या संख्येपेक्षा दोन कपाटामधे जास्तीच्या असल्याचं लक्षात आलं. दोन वर्षांपूर्वी जुन्या पण दुरुस्त करुन आणलेल्या छत्र्यांना हातही लावलेला नव्हता कोणी. मग त्यातली एक आमच्याकडे रोजचा कचरा गोळा करायला येणा-या लक्ष्मीला दिली आणि दुसरीही तिलाच दिली, तिच्या मुलीला शाळेत जायला लागेल असं ती म्हणाली म्हणून.

या व्यतिरिक्त जुन्या लॅपटॉपसोबत आलेली सॅक आणि नव-याची एक आदीम काळातली ब्रीफ़केस, फ़्रीजच्या मागे ठेवलेली लाकडी फ़ळी (लागलंच कुठे तर शेल्फ़ मारायला होईल म्हणून ’जपलेली’), एक आता ’लिहिणं आणि पुसणं’ दोन्ही शक्य नसलेला निरोपानिरोपीचा/टू डू यादीकरता बराच वापरुन झालेला व्हाइट बोर्ड असंही सामान बाहेर निघालं.
लॅपटॉपची सॅक काढल्यावर इ-कचराही काढावा असं मनात आलं पण लगाम घातला उत्साहाला.




जमलं तर हे दोन्ही भाग पुन्हा वाचा-

स्त्रिया आणि मिनिमलिझम-एक

स्त्रिया आणि मिनिमलिझम-दोन

Friday, July 14, 2017

दिवस- तिसरा

जगभर कामानिमित्ताने किंवा आवडीने प्रवास करत फ़िरताना सुवेनियर्स गोळा करत रहाण्याचा उत्साह सगळ्यांनाच असतो. पण नंतर ती घरात अडगळ निर्माण करतात, धूळ खात पडून रहातात. ललिता जेम्सने यावर एक मस्त उपाय शोधून काढला. आवडलेल्या वस्तु डिजिटल फोटोच्या स्वरुपात जतन करायच्या. हे तर बेस्टच वाटलं मला. मी सगळी सुवेनियर्स एका खोक्यात जमा करुन ठेवली आहेत सध्या. काढून टाकायला जीव होत नाहीए. त्या त्या ठिकाणी केलेल्या प्रवासांच्या आठवणी त्यात आहेत. पण आता सगळ्यांचे फोटो काढणार.

आज माझी धाड शू रॅकवर होती. पावसाळा सुरु झाल्यापासूनच घोकत होते जुन्या चपला, शूज काढून टाकायच्या. हल्ली मी हिल्स घालणं बंद केलं आहे, पण काही आवडत्या हाय हिल्स असलेल्या सॅन्डल्स ठेवल्या होत्या. ट्रेकिंग बंद करुन जमाना झाला पण उत्तम, मजबूत बांधणीचे ट्रेकर्स शूज नीट रॅप करुन ठेवलेले. बाकी घरात घालायच्या स्लिपर्सचे जुने जोड, मुलीचे फ़्लोटर्स, बॅले शूज, सॅन्डल्स असं बरंच दिसलं. सगळं  बाजूला काढलं. आता मस्त रिकामी दिसते आहे शू रॅक, पावसाळ्यात सादळणारा वास घालवायला फ़्रेशनर्स ठेवलेत.


माझ्याकडे स्टीलच्या चायना प्लेट्स आणि वाडगे यांचा अपरिमित साठा आहे असं वाटत रहातं मला. स्टीलच्या प्लेट्स झाकण्या म्हणूनच जास्त वापरल्या जातात. शिवाय फ़ार जागा व्यापत नाहीत. त्यामुळे काढूनही टाकल्या जास्त नाहीत. स्टीलची मोठी ताटं तर मी आमच्याकडे पोळ्या करणा-या बाईला कधीच देऊन टाकली होती. बरेच डाव, झारे वगैरेही. आज स्टीलच्या प्लेट्स आणि जास्तीच्या वाडग्यांची पाळी. काही पातळ स्टीलचे वाडगे आतून जळालेलेही आहेत थेट गॅवर ठेवल्याने. तरीही मी ते सांभाळून ठेवलेत. का? माहित नाही.
अजून काही डबे वगैरे आहेत पण ते जरा विचार करुन काढीन. नाहीतर ऐन वेळी पंचाईत होते. मागे मी अती उत्साहाच्या भरात मोठाल्या जुन्या चिनीमातीच्या बरण्या देऊन टाकलेल्या आणि मग एक दोन तरी ठेवायला हव्या होत्या अशी हळहळ वाटत राहिली. अर्थात भावनिक हळहळ म्हणतात ती हीच. कारण टेक्निकली त्यांची काहीच गरज लागलेली नाही आजवर. 



तिसरी वस्तु आहे काचेचे कप, बशा, मग. हेही गरजेपेक्षा खूप जास्त आहेत. थोडे थोडेच काढते. कारण मग ऐन वेळी तुटवडा येतो खूप जण एकदम पाहुणे आले तर. 



रुपा धारप ही मैत्रीण लिहिते की घरातल्या उगीच साठवलेल्या वस्तु काढल्या की मनाला खूप शांतता वाटते. खरंच आहे, आजूबाजूची अडगळ स्ट्रेस निर्माण करते. रुपा पुढे म्हणते की ती डी-क्लटरिंग स्टेजवरच आहे अजून, याला मिनिमलिझम वगैरे नाव देण्याचं धाडस अजून होत नाही. हेही खरंच आहे. अडगळ विरहित वातावरण स्वत:भोवती निर्माण करण्याचा प्रयत्न हा मिनिमलिझमच्या मार्गावरचा अगदी सुरुवातीचा टप्पा आहे. मनातल्या पसा-यापर्यंत पोचायला अजून खूप वेळ आहे.

Thursday, July 13, 2017

दिवस- दुसरा

रोज तीन वस्तु ’टाकून देणे’ या शब्दप्रयोगा ऐवजी ’देऊन टाकणे’ असा बदल अरुंधती देवस्थळीने सुचवला तो मला पटला. खरं तर मी काढलेल्या वस्तु शब्दश: कचरापेटीमधे टाकून देण्याकरता बाजूला काढणार नाही आहे हे नक्की. पण तसं अभिप्रेत होणेही चूक आहे.
एखाद्याला गरजूला, ज्याला या वस्तुंचा उपयोग आहे त्याला देणे हा अग्रक्रम, त्यानंतर त्या रिसायकल करता येतील का विचार महत्वाचा आहे. तो मी नक्कीच करणार आहे.

आजच्या दुस-या दिवशी अजून तीन वस्तु (तीन या संख्येमधे साधारण तीन कॅटेगरी असं अपेक्षित आहे. अर्थात प्रत्येक वेळी त्यात एकापेक्षा जास्त वस्तु असतीलच असं नाही) बाजूला काढणे मला अर्थातच फ़ार जड गेले नाही. सध्या आजूबाजूला नजर फ़िरवली, कपाट उघडलं तरी पटकन कळतय काय मला नको आहे, काय माझ्याकडे अतिरिक्त आहे. त्यामुळे सोपं जाणार आहेच. खरी अडगळ नजरेआड आहे पण तिकडे बघायला सध्या माझ्याकडे फ़ार वेळ नाही. हातात जास्त कामे आहेत.

तर आजच्या वस्तुंबद्दल

१) कुकी कटर- हे मला एका नातेवाईक गृहिणीने मोठ्या प्रेमानी दिले. अर्थात मी कधीच कुकीज वगैरे घरी करण्याच्या भानगडीत पडले नव्हते, पडणारही नाही याची त्यांना कल्पना नसावी. त्यांनी तरीही ते मलाच का दिले हेही माहित नाही. गेली अनेक वर्षं ते तसंच्या तसं माझ्या किचन ड्रॉवरमधे पडून आहे. कोणी कितीही प्रेमाने काही देऊ केलं तरी जर तुम्हाला त्या वस्तुचा काहीच उपयोग नसेल तर भीड पडू न देता ’नको’ असे सांगायला हवे हा लहानसा धडा यातून शिकता येईल. अर्थात धडे शिकणे या बाबतीत मी मुळातच इतकी ड आहे की ते फ़ार माझ्या बाबतीत फ़ार शक्य व्हायचे नाही. तुम्ही बघा.


२) लिपस्टीक्स/नेलपेंट्स
एकेकाळी मला अक्षरश: वेड होतं या दोन गोष्टींचं. मी त्या भरमसाठ घ्यायचे. माझ्याकडे लिपस्टीक्स/नेलपेंट्सचं सुंदर कलेक्शन होतं. वापरायचे कमी. त्यातल्या त्यात लिपस्टीक्स जास्त वापरल्या जायच्या. पण बहुतेकदा त्याच त्याच शेड्स. नव्या, घेताना आकर्षक दिसलेल्या, जास्त ग्लॉसी, शिमर असलेल्या किंवा फ़िक्या शेड्स तशाच्या तशा पडून असायच्या. मग एक्स्पायरी डेट संपलेली असली तरी त्या तशाच. आता माझं हे वेड ऑलमोस्ट संपलय. मी आवडत्या शेड्सच्या दोन किंवा तीनच लिपस्टीक्स आणि अगदी मोजकी नेलपेंट्स जवळ ठेवते. मुलींना फ़ार आवडतच नाही त्या वापरायला. असं असलं तरी कॉस्मेटीक बॉक्समधे अजूनही ’साठा’ तयार होतोच. जुन्या झालेल्या मी वेळीच टाकून दिल्या नाहीत म्हणूनही. तर आज आधी त्या बाजूला काढल्या.



३) चायनीज टी डिस्पेन्सर्स
माझा नवरा कामानिमित्ताने खूप वेळा चीनला जातो. काहीवेळा मीही जाते. मला ग्रीन टी खूप आवडतो. त्यामुळे हे डिस्पेन्सर्स माझ्याकडे सारखे जमा होतात. अनेकदा मैत्रीणींना भेट देऊनही उरतात. काही वापरलेले असतात त्यामुळे देता येत नाहीत. तर त्यातले काही बाजूला काढले आहेत.



कालच्या पोस्टला प्रतिसाद म्हणून अजूनही काही मैत्रिणी यामधे सामिल झाल्या आहेत. त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा!

Tuesday, July 11, 2017

दिवस पहिला

सर्वात जास्त साठणारी वस्तु म्हणजे अर्थातच कपडे. तेव्हा पहिला मोर्चा तिकडे वळवला.
मिथिला, माझी मोठी मुलगी कामानिमित्त एक वर्षाकरता परदेशी गेली आहे. तिचे काही जुने कपडे तिने जाताना मला ’टाकून दे’ असं सांगीतलं होतं. पण माझा आळशीपणा. त्यामुळे मी ते नीट बॅगेत ठेवून बॅग नीट कपाटाच्या खालच्या कप्प्यात सारुन ठेवली. अजूनही कामी कपडे त्यात टाकून मग सगळे एकत्र टाकू वगैरे त्यामागे विचार. पण आता सहा महिने झाल्यावरही ती बॅग तिथेच होती. तेव्हा पहिली वस्तु लगेच मिळाली.
जुन्या कपड्यांची बॅग.




मी प्लास्टीकच्या बाटल्या, डबे, जार्स फ़ार वापरत नाही. पण काहीवेळा रिकाम्या झालेल्या (विशेषत: गोवर्धन तुपाच्या) बाटल्या चांगल्या फ़ूडग्रेड प्लास्टीकच्या आणि आटोपशीर आकाराच्या असल्याने त्यात काहीतरी ठेवलं जातं. पण तेवढ्यापुरतंच. मग त्या मी बाजूलाच कपाटाच्या एका कोप-यात सारुन ठेवते. माझ्याकडच्या काही काचेच्या चांगल्या बाटल्यांची झाकणे खराब झाली होती. ती नवी आणून त्या बाटल्या, बरण्या पुन्हा वापरायचं मनात होतं. पण ते काही झालं नाही. आता मी त्यातल्या अगदी आवश्यक तेवढ्याच बाजूला ठेवून उरलेल्या सगळ्यांची टाकून द्यायच्या लॉटमधे भरती केली.



तिसरी वस्तुही सहज मिळाली. जुन्या शॉपिंग बॅग्ज आणि पर्सेस. ठराविकच वापरल्या जातात आणि बाकिच्या अनेक धूळ खात खणात एकात एक घातलेल्या पडून होत्या. काही पर्सेस आता पावसाळ्यात वापरु म्हणून ठेवलेल्या, पण त्या फ़ार वापरायच्या अवस्थेत नाहीत असं लक्षात आलं. तेव्हा त्यातल्या ब-याचशा उचलल्या आणि टाकून द्यायच्या लॉटमधे सरकवल्या.



आता उद्या काय टाकता येईल याकरता आजूबाजूला बघते आहे. भरपूर काय काय दिसतय. 

मिनिमलिझमच्या रस्त्यावरचा प्रवास..

मिनिमलिझमच्या रस्त्यावरचा प्रवास हा न संपणारा आहे. कॉलम लिहित असताना आणि नंतरही कमीत कमी खरेदी, घरात अडगळ न साचू देणे याची काळजी घेणे या गोष्टी शक्य तितक्या कटाक्षाने पाळत असूनही दर काही महिन्यांनी घरात टाकून देण्यासारख्या पण न टाकलेल्या वस्तुंचा साठा होतच रहातो हे चमत्कारापेक्षा कमी नसते. यामागचे मुख्य कारण आपल्याला खरेदी टाळता येतच नाही, घरी मुलं, इतर माणसं असतात त्यांनाही खरेदी करायला आवडत असते. घरातल्या जुन्या वस्तु निरुपयोगी, निकामी होतात त्या तात्काळ टाकून दिल्या जात नाहीत. कधी कधी त्या वस्तुंबद्दल निर्माण झालेली ओढ, सवय किंवा या दुरुस्त करुन वापरु शकू याची खात्री, अनेकदा टाकून द्यायचा निव्वळ कंटाळा.

आता यावर उपाय काय? तर माझी मैत्रीण आरती रानडे आणि मी अशा दोघींनी मिळून रोज कमीतकमी तीन अनावश्यक वस्तू टाकून द्यायच्या असं ठरवलं आहे. रोजच्या रोज त्याचे फोटोही एकमेकींना पाठवायचे म्हणजे निदान त्यामुळे नियमितता राहिल.

इथेही त्याबद्दल मी रोज लिहित राहिनच. तुम्हाला कोणाला यामधे सामिल व्हायचे असेल तर जरुर व्हा. फोटो मात्र काढा तुम्ही टाकून दिलेल्या वस्तुंचे.
आणि त्याबद्दल लिहाही.

मिनिमलिझमच्या वाटेवरचा कारवां वाढता राहूदे. 

Tuesday, March 14, 2017

कपाट आवरुन स्वच्छ झालं आहे का?

भोवतालच्या आणि आतल्या अडगळीचा, पसा-याचा मनावर येणारा ताण अती झाला, कोलाहल वाढला आणि त्यातून हा कॉलम सुरु झाला. 
जीवनशैली सोपी, ताणविरहित करायचे वैयक्तिक पातळीवर प्रयत्न चालू असताना साहजिकच बाहेरच्या जगातही या संदर्भात अनेकांचे चालत असलेले प्रयोग वाचनात येत राहिले. 
मिनिमलिझम हे तत्व किती वेगवेगळ्या पातळ्यांवर, सखोलतेनं आणि सहजतेनं आपल्या रोजच्या आयुष्यात सामावून घेता येऊ शकतं हे त्यातूनच लक्षात येत गेलं. 

कोणताही बदल हा कधीच सोपा नसतो. जीवनशैलीतला तर नाहीच. 
अडथळे, पसारा, अडगळ आपणच निर्माण केलेले असतात, ते दूर सारणं, आवरुन ठेवणं आणि मोकळा, स्वच्छ अवकाश आपल्या सभोवताली निर्माण करणं, आणि मग तो आपल्या आत झिरपू देणं हे साधं वाटणारं वाक्य जीवनाचे तत्व म्हणून स्विकारण्याचे प्रयत्न शतकानुशतके, वेगवेगळ्या संस्कृतीमधे अनेकांनी केले. पिढ्यानपिढ्या ते हस्तांतरित होत राहिले. झेनसारख्या तत्वद्न्यानाचा पाया त्यातून उभारला गेला.

मिनिमलिझम माझ्या जीवनशैलीत पूर्णपणे भिनला गेला आहे का
या प्रश्नाला होअसे उत्तर द्यायला आवडले असते. पण ते तसे देता यावे याकरताच तर हा अट्टाहास. 
कधीतरी, आयुष्यातल्या पुढच्या एखाद्या टप्प्यावर ते निश्चितच देता येईल. तोवर कमीतकमी खरेदी, गरजेपुरतीच साठवण, पसा-याचे व्यवस्थापन सातत्याने करत रहाणे हे आवर्जुन करत रहाणे आवश्यक. 

नविन वर्ष उंबरठ्यावर असताना तुम्हालाही नव्याने मिनिमलिझमच्या संकल्पाची आठवण त्याकरताच नव्याने करुन द्यायची आहे.

तुमचं कामाचं टेबल फ़ाईल्स, पुस्तके, बिलं, पावत्या, कागद, कामाच्या याद्या यांनी गजबलेले असेल, तुमचं कपड्यांचं कपाट न होणारे कपडे, उन्ह न लागलेल्या साड्या, महागडे पण घट्ट ब्लाउज, ओढण्यांच्या गुंडाळ्या, स्टोल्स, जॅकेट्सच्या पसा-याने ओसंडून वहात असेल तर नववर्षाच्या संकल्पाच्या याद्या बनवण्याच्या आत तुम्ही एका जागी जरा शांत बसा आणि स्वत:शीच मान्य करा की मला मिनिमलिस्ट लाइफ़स्टाइलची तत्वे पुन्हा एकदा जाणून घ्यायची गरज आहे. 
आतला आणि बाहेरचा पसारा, अडगळ आवरण्याची गरज आहे. 
तुमच्या आतही असाच पसारा असेल हे वेगळं सांगायची गरजच नाही. तुमच्या भोवतालातच त्याचं प्रतिबिंब पडलेलं असतं.

पसारा किंवा अडगळ होण्याचं, साठण्याचं एकमेव कारण म्हणजे लेट गोकरण्याची, नको असलेलं सहजतेनं सोडून देण्याची स्वत्तली अक्षमता. त्यात कधी भावनिकता असते, आठवण असते, किंवा भविष्याची आशाही असू शकते. 
अर्थात आपला आळशीपणा, हलगर्जीपणा किंवा बेफ़िकिरपणाही तितक्याच प्रमाणात असू शकतो. 
तेव्हा कारणामधे फ़ार गुंतून न रहाता उठा आणि फ़ेकून द्या, किंवा पुनर्वापर करायला योग्य व्यक्तींच्या हवाली करा. 

आपल्या रोजच्या जगण्यातले कानाकोपरे या अडगळीमुळे धूळीने व्यापून जातात, आपल्यातली कार्यक्षमता मंदावते, आर्थिक क्षमता खालावते. ज्या क्षणी अडगळ, पसारा आवरायचा जाणीवपूर्वक निर्णय तुम्ही घेता त्याच क्षणी स्वच्छ, हवेशीर भोवताल तुमच्या अवती भवती, आतमधे निर्माण होण्याची प्रक्रिया सुरुही झालेली असते. 
भावनिकदृष्ट्या हलकं, सकारात्मक वाटण्याची ही सुरुवात असते.

आपण इतक्या वस्तु साठवून ठेवू शकलो, आपल्याकडे इतक्या साड्या, कपडे, दागिने, भांडी, पुस्तकं आहेत.. 
हे जमा करण्यात आपण आपल्या श्रमाने साठवलेले पैसे, वेळ खर्च केला आहे, आपल्या वाडवडिलांनी, सुहृदांनी प्रेमाने सोपवल्या आहेत त्यातल्या ब-याच गोष्टी आपल्याकडे त्यामुळे या सर्वांबद्दल मनोमन कृतद्न्यता व्यक्त करुन त्यातल्या न लागणा-या, जास्तीच्या, तुमच्याकरता निरुपयोगी वस्तु अशा कुणाकडे तरी सोपवा ज्यांना त्याचा उपयोग होईल. 
तसं कोणी आसपास नसेलच तर फ़ेकून द्या, विका किंवा दान करा. 
मारी कोन्दोने सुचवलेल्या कोनमारी मेथडचा त्याकरता वापर करु शकता. 

मारी कोन्दो सुचवते- तुम्हाला काय फ़ेकायचं आहे हे ठरवता येत नसेल तर तुम्हाला स्वत:कडे काय ठेवावसं वाटतं याचा विचार आधी करा. त्या वस्तुंकरता चांगली, मोकळी, हवेशीर जागा निर्माण करा. 
हे कसं करायचं
तर त्याकरता सगळे कपडे, पुस्तकं, वस्तु वेगवेगळ्या ढिगा-यात समोर रचा. 
मग एक एक कपडा, पुस्तक, वस्तु हातात घ्या, निरखा, विचार करा. तुम्हाला खरंच हवी आहे का ही
या वस्तुकडे पाहिल्यावर मनात आनंदाची भावना निर्माण होत आहे का? असेल तर ठेवा. नसेल तर टाकून द्या.

अजून एक पसारा, अडगळ आवरण्याची पद्धत म्हणजे चार खोक्यांवर नावं लिहा- ठेवणे, टाकून देणे, गरजूला देणे, नंतर ठरवणे. 
आणि मग ही चारही खोकी घरातल्या प्रत्येक कपाटासमोर, टेबलासमोर, साठवणुकीच्या जागेसमोर फ़िरवा. 
ती भरली की मग पुन्हा एकदा घर लावा. 
अर्थात ठेवणेनाव लिहिलेल्या खोक्यात जास्त वस्तु भरल्या गेल्या तर मात्र ही पद्धत तुमच्याकरता उपयोगाची नाही.

अजून एक सोपी पण काहीशी दीर्घ पद्धत म्हणजे रोज एक वस्तु टाकून देणे किंवा देऊन टाकणे. 
अर्थातच यात नव्याने खरेदी करुन रिकामी जागा लगेच भरण्याचा पर्यात उपलब्ध नाही. 
त्याकरता संकल्पाच्या यादीमधे सर्वात वर गरज नसताना खरेदी न करण्याचा, सेलच्या जाहिरातींना बळी न पडण्याचा, वस्तु न साठवण्याचा निश्चय लिहा.

मिनिमलिस्ट जीवनशैली म्हणजेच कमीतकमी वस्तुंच्या सहायाने, अडगळीवाचून आयुष्य जगणे ही एक सुंदर, सहज, सोपी, पर्यावरणस्नेही जीवनशैली आहे. आयुष्य समृद्ध करणारी. 
नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येलाच तिचे तुमच्या जीवनात स्वागत करा.

“There are two ways to be rich: One is by acquiring much, and the other is by desiring little.”

  

लोकमत दैनिकाच्या 'मंथन' पुरवणीच्या कॉलममधे या ब्लॉगवरच्या सर्व पोस्ट्स प्रकाशित झालेल्या आहेत. 

स्त्रिया आणि मिनिमलिझम- दोन

आपण स्त्री असल्याने आपल्याला आपणच जमवलेला आपल्या सभोवतालचा इतका मोठा पसारा, माणसांचा, भावनांचा आणि अर्थातच वस्तुंचा, आवरणं काही शक्य नाही, त्या पसा-यावाचून एकांडेपणाने जगणं आपल्याला जमणार नाही, त्यामुळे आपण मिनिमलिझमपासून लांबच राहिलेले बरं असं म्हणत, मिनिमलिझमची तत्वे, त्यांची आपल्या आयुष्यातली आवश्यकता पटूनही ज्या स्त्रिया त्यापासून दूर रहातात, त्यांच्याकरता कर्टनी कार्व्हरने ’विमेन कॅन बी मिनिमलिस्ट टू’ हा ब्लॉग सुरु केला. 

मिनिमलिझम हा वस्तुंपेक्षाही दृष्टीकोनाशी जास्त निगडीत आहे असं ठाम मत असणा-या कर्टनीच्या मते स्त्रिया आपल्या भोवती वस्तुंचा जितका पसारा साठवतात त्यापेक्षा कितीतरी पट अधिक मनात साशंकता आणि भिती यांची अडगळ सांभाळून असतात. 
कोणतीही नवी गोष्ट अथवा तत्व स्विकारायची वेळ आली की स्त्रिया तो उपसायला लागतात.
जसे की-
आपल्याला आता खूप उशीर झाला आहे हे सुरु करायला.
कुटुंबातले लोक, मित्र-मैत्रीणी काय विचार करतील
आपल्या व्यस्त दिनक्रमामधून याकरता वेळ कसा काढायचा
आपल्याला हे जगावेगळं काहीतरी करावसं वाटत आहे याचा अपराधीपणा
सवयीच्या वागण्यापासून लांब जाण्याची भिती

अशा असंख्य अडगळीचं ओझं स्त्रिया मनावर वागवतात. त्यांना हे ओझं फ़ेकून द्यायला प्रेरित करावं हा उद्देश कर्टनीच्या मनात होता. 
त्याकरता प्रत्यक्ष ज्या स्त्रिया मिनिमलिस्ट जगत आहेत त्यांचे अनुभव तिने संकलित केले. डिक्लटरिंग आणि मिनिमलिझमच्या टीप्स देणे हा हेतू त्यात नाही. मिनिमलिस्ट जीवनशैलीमधे आपल्या कुटुंबियांना, परिचितांनाही कसे सामावून घ्यायचे हे त्यातून मुख्यत्वे शिकता येते. 

सामान पाठीवर लादून जगभर हवे तेव्हा फ़िरता यावे हा ’पुरुषी’ स्वकेंद्रित दृष्टीकोन स्त्रियांच्या मिनिमलिझममधे नाही. स्त्रियाचा मिनिमलिझमकडे बघणारा दृष्टीकोन सर्वसमावेशक आहे. 
कुटुंब केंद्रस्थानी असणारा तिचा हा परिघ पर्यावरणाला कवेत घेत विस्तारत जातो.

मिनिमलिझमकडे वळणा-या स्त्रियांमधे सिंगल मदर्सची संख्या सर्वात जास्त असते, कारण गरजेपोटी, आर्थिक चणचणीवर उपाय म्हणून त्या मिनिमलिस्ट होतात हा एक सर्वसाधारण प्रवाद कर्टनीने संकलित केलेल्या मिनिमलिस्ट स्त्रियांच्या अनुभवांवरुन सहज खोडला जातो. 
भल्यामोठ्या कुटुंबात वाढलेल्या आणि युनिव्हर्सिटीत शिकायला बाहेर पडलेल्या सतरा वर्षांच्या रोझपासून न्यूयॉर्कमधे स्वत:चा स्कल्प्चर स्टुडिओ असणा-या एवलिनपर्यंत, एकुलती एक मुलगी म्हणून लाडाकोडात, खोलीभरुन कपडे आणि खेळण्यांच्या पसा-यात वाढलेल्या ओक्लाहोमाच्या सारा पासून चायना टाऊनमधे दोन खणी घरात रहाणा-या सिंगापूरच्या नोरापर्यंत अनेक जणी आयुष्य सोपे, सुंदर करण्याकरता मिनिमलिझमकडे वळल्या आहेत. 

स्वच्छता, सौंदर्य यांची उपजतच आवड स्त्रियांमधे असते, मुलींना उत्कृष्ट गृहिणी बनण्याचे ट्रेनिंग घराघरांमधून दिलं जात असल्याने मिनिमलिझम हा तिच्या दृष्टीने टापटिपीने आयुष्य जगण्यापेक्षा फ़ार वेगळं मुळातच नसतं, मात्र त्याही पलिकडे जाऊन जेव्हा आपल्या घरातली स्त्री जेव्हा जाणीवपूर्वक मिनिमलिझम कडे वळते, मिनिमलिस्ट जीवनशैली कुटुंबियांमधे रुजवू पहाते तेव्हा तिला कुटुंबाचा सपोर्ट मिळतो का, या मुलभूत प्रश्नाचे उत्तर मात्र नकारात्मक येते. 

’रिअल लाइफ़ मिनिमलिस्ट’ जेनचा अनुभव या बाबतीत प्रातिनिधिक ठरावा. 
जेनचे सासरचे घर भलेमोठे, अनेक खोल्या, त्यात भरपूर फ़र्निचर, कपाटे आणि त्यातून ओसंडून वहाणारे सामान. आजीच्या मृत्यूनंतर जेन आणि तिच्या नव-याकडे हे वडिलोपार्जित घर वारसाहक्काने आले त्यातल्या जुन्या सामानासकट. कित्येक दशके कुणाचा हातही न लागलेल्या वस्तू, कपडे जेनने आवरायला काढल्या, गरजूंना वापरता येतील म्हणून तिने त्या खोक्यांमधे भरल्या. 
मात्र जेनच्या नव-याने आपल्या आजीच्या एकाही वस्तूला तिला हात लावता येणार नाही असे बजावले. अडगळीने भरलेल्या घरामधे रहाण्यापेक्षा जेनने मग स्वतंत्रपणे लहानशा अपार्टमेंटमधे रहाण्याचा पर्याय निवडला.

मार्थाची सासू वस्तु संग्राहक होती. खरेदीचे तिला व्यसन होते. सासू आजारी पडल्यावर मार्था तिची शुश्रूषा करण्याकरता आपल्या सासरच्या घरी गेली तेव्हा शेकडो पर्सेस, शूज, कपडे, सजावटीच्या वस्तू यांनी कपाटे भरलेली होती. मिनिमलिस्ट मार्थाने सासूची देखभाल करत असतानाच तिच्या घरातला हा पसारा आवरण्याचे, आणि तब्येत सुधारल्यावर सासूला तिच्या संग्राहक वृत्तीतून, वस्तू खरेदी करत रहाण्याच्या व्यसनातून सोडवण्याचे आव्हान स्विकारले. 
मार्थाला याकरता तीन वर्षे लागली. खरेदीचे व्यसन सुटणे अवघड होते, मात्र त्याकरता मार्थाच्या मदतीला तिच्या सासूचा जुना, आता विस्मरणात गेलेला छंद आला. टेराकोटाची भांडी बनवण्याच्या तिच्या छंदाचे मार्थाने पुनरुज्जीवन केले. 
आता पाच वर्षांनंतर सासूला पुन्हा भेटायला गेल्यावर तिच्या स्वच्छ, सुंदर, प्रकाशित घरामधे टेराकोटाच्या कलात्मक वस्तुंचा पसारा पाहून मार्थाच्या डोळ्यात पाणी आले. 

मार्था लिहिते- “व्हिक्टोरियाने, म्हणजे माझ्या सासूने मिनिमलिझमचा संपूर्ण स्विकार केल्याचे मला जाणवले जेव्हा मी तिची टेराकोटाची भांडी पाहिली. त्यांचा आकार, रंग, त्यावरचे डिझाईनही मिनिमलिस्ट शैलीतले होते.”

मिनिमलिस्ट दृष्टीकोन तुमच्या जीवनशैलीमधेच नाही, तर तुमच्या वृत्तीमधे, व्यक्तिमत्वामधे, तुमच्या हातातल्या कलेमधेही किती सहज झिरपतो याचे हे उदाहरण. 

चित्रकला, शिल्पकला या क्षेत्रांमधे कार्यरत असलेल्या मिनिमलिस्ट स्त्रियांना या संदर्भात काय सांगायचे आहे, त्यांच्या कलाकृतींमधून दिसणारा मिनिमलिझम त्यांच्या जीवनशैलीविषयी काय भाष्य करतो याबद्दल आपण पाहूया पुढच्या भागामधे-